धामोरी दि .16 प्रतिनिधी ( दत्तात्रय घुले ) कोपरगाव : कोपरगाव आगारातून टाकळी, रवंदे मार्गे धामोरी, चासनळी व वडगाव बक्तरपूर या गावांसाठी दररोज पाच ते सहा वेळा एसटी बस सेवा धावत असते. मात्र या बसगाड्यांवर नामनिर्देशक फलक (रूट बोर्ड) नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून बस नेमकी कोणत्या गावाकडे जात आहे हेच कळत नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बस स्थानकात उभ्या असलेल्या अनेक बसवर मार्गदर्शक फलक नसल्यामुळे प्रवाशांना योग्य बस ओळखणे कठीण जाते. परिणामी अनेकदा प्रवासी चुकीच्या बसमध्ये बसतात. ग्रामीण भागातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
प्रवाशांनी बस चालक किंवा वाहक (कंडक्टर) यांना मार्गाबाबत विचारणा केली तरी काही वेळा समाधानकारक माहिती मिळत नाही, अशीही तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. त्यामुळे सुशिक्षित प्रवासी देखील अडचणीत सापडत आहेत.
दरम्यान, या समस्येमुळे धामोरी व परिसरातील नागरिकांना रोजच त्रास सहन करावा लागत असल्याने संबंधित एसटी प्रशासनाने या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन कोपरगाव-धामोरी मार्गावरील बसगाड्यांवर स्पष्ट नामनिर्देशक फलक बसवावेत, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
* प्रवाशांची मागणी :
सर्व बसगाड्यांवर स्पष्ट नामनिर्देशक फलक लावावेत .
बस स्थानकात मार्ग माहिती फलक बसवावेत .
चालक व वाहकांनी प्रवाशांना योग्य माहिती द्यावी .
























