रावेर दि .29 (प्रतिनिधी ) बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे तसेच रावेर शहरात महिलांसाठी ठिकठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत या मागण्यांसाठी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला सहाव्या दिवशी ऐतिहासिक यश मिळाले.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातून मध्य प्रदेश सीमेपर्यंत जोडल्या जाणाऱ्या बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी दि. २३ मार्च २०२६ पासून रावेर तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. मात्र शासन प्रशासनाने आंदोलनाची संथ गतीने दखल घेतल्यामुळे निळे निशाण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी दि. २६ मार्चपासून अन्न व पाण्याचा त्याग करून उपोषण सुरू केले.
त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला आणि आंदोलन तीव्र झाले. परिस्थिती गंभीर होत असल्याने प्रशासनाच्या हालचालींना वेग आला. नगरपरिषदेकडून तातडीने सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आणि एनएचएआयच्या संमतीनुसार बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाला अधिकृतरित्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
निर्णय झाल्यानंतर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी नायब तहसीलदार संजय तायडे व नगरपालिका मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांचे आभार मानले. मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “निळे निशाण संघटनेला मिळालेले हे यश फक्त यश नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा आम्हाला मिळालेला गौरव आहे.” असे सांगून त्यांनी अमरण उपोषणाची सांगता केली.
यानंतर शेकडो समाज बांधवांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीसह भीमसैनिकांनी जयघोष करत जल्लोष साजरा केला.
या प्रसंगी नगरसेविका अनिता तायडे, माजी नगरसेवक जगदीश घेटे, ॲड. दीपक तायडे, पंकज वाघ, प्रदीप सपकाळे, सावन मेढे आदी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सदाशिव निकम, संजय तायडे, विलास तायडे, महेंद्र कोचुरे, नारायण सवर्णे, विक्की जाधव, उदय वाघ, गोकुळ रायमळे, विशाल तायडे, विठ्ठल गाढे, महेंद्र कावडकर, अक्षय इंगळे, दिनेश ससाणे, मोहन ससाणे, आकाश निकम, अर्जुन तायडे, नंदा बाविस्कर, संगिताबाई घेटे, सुशिला बाविस्कर, अल्का जाधव, उज्वला वाघ, संध्या अटकाळे व इतर शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
























