रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- “सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात,” या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला. दि. २३ एप्रिल २०२६ रोजी गुरुवारी विविध मागण्यांसाठी मोठे आंदोलन छेडण्यात आले.
केंद्र व राज्य सरकारकडून ओबीसी जातीनिहाय जनगणना न केल्याच्या निषेधार्थ, शिक्षकांना टीईटी परीक्षेतून सूट न देण्याच्या विरोधात तसेच युजीसी विधेयकाच्या समर्थनार्थ भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर रावेर शहर पूर्णतः बंद ठेवण्यात आले.
मुख्य आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करून निदर्शने करण्यात आली. बुरहानपूर, मुक्ताईनगर, सावदा आणि फैजपूरकडे जाणाऱ्या मार्गांना जोडणाऱ्या या चौकात सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. कडक उन्हात आंदोलकांनी “ओबीसी की जातिगत गिनती करो, वरना कुर्सी खाली करो”, “शिक्षकांना टीईटीमधून मुक्त करा”, “युजीसी बिल लागू करा”, “ईव्हीएम हटाव, देश बचाव” अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
आंदोलनाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
हे आंदोलन भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष विशाल तायडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. मार्गदर्शनासाठी खांदेश विभाग प्रभारी नितीन गाढे आणि जिल्हा उपाध्यक्ष महेश तायडे उपस्थित होते. यावेळी कामगार नेते दिलीप कांबळे, सामाजिक समता मंचचे उमेश गाढे, मौर्य क्रांती संघाचे महेंद्र धनगर, भारतीय बेरोजगारमोर्चाचे सिद्धार्थ तायडे, मधुकर कुंभार, मौलाना अख्तर, एमआयएमचे वसीमभाई तसेच अन्य मान्यवर व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
रावेर शहरातील हे आंदोलन उत्स्फूर्त प्रतिसादासह यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
























