रावेर दि . 12 (प्रतिनिधी ) रावेर तालुक्यातील अटवाडे येथे सुरू असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य गोकुळ भाऊराव करवले यांनी केला आहे. या संदर्भात गटविकास अधिकारी, पंचायत समिती रावेर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात आली आहे. मात्र तक्रारीनंतरही प्रशासनाकडून कोणती ही ठोस कारवाई किंवा चौकशी झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाखो रुपयांच्या अंदाजपत्रकाचे हे बांधकाम प्रत्यक्षात अंदाजपत्रकानुसार न होता मनमानी पद्धतीने सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बांधकामस्थळी शासन नियमांनुसार आवश्यक असलेला माहितीफलक (कामाचा बोर्ड) देखील लावलेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे काम कोणत्या विभागामार्फत सुरू आहे, कामाचा खर्च किती आहे तसेच ठेकेदार कोण आहे याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

सार्वजनिक बांधकामाच्या ठिकाणी निधी, कामाचा तपशील, ठेकेदाराचे नाव व कामाचा कालावधी दर्शविणारा माहितीफलक लावणे बंधनकारक असते. मात्र अटवाडे येथील या कामात त्या नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने काम सुरू असल्यामुळे लाखो रुए निधीचा अपव्यय होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा परिसरात सुरू असून तक्रारीची तात्काळ दखल घेऊन या बांधकामाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दोषींवर कठोर कारवाई करून निकृष्ट दर्जाचे काम थांबवावे, अशी मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, प्रशासनाने या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन कारवाई केली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य गोकुळ भाऊराव करवले यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे अटवाडे गावासह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
कामाचा माहितीफलकच नाही….
अटवाडे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामस्थळी शासन नियमानुसार लावायचा माहितीफलकच नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कामाचा खर्च, ठेकेदाराचे नाव व कामाचा कालावधी याबाबत कांना कोणतीही माहिती मिळत नसल्याने पारदर्शक प्रश्न उपस्थित होत आहेत.























