यावल दि .१४ तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन वा इतर राष्ट्रीय सणांमध्ये ध्वजारोहणाचा मान हा सामान्यतः पदाधिकारी किंवा प्रतिष्ठित व्यक्तींना दिला जातो. मात्र साकळी ग्रामपंचायतीने यंदाच्या १५ ऑगस्टच्या ध्वजारोहणाला वेगळेपण दिले आहे. सरपंच दिपक नागो पाटील यांच्या पुढाकाराने हा बहुमान दिवंगत ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी कालकथीत चिंतामण टोपलू सुरवाडे यांच्या पत्नी श्रीमती बेबाबाई चिंतामण सुरवाडे यांना प्रदान करण्यात आला आहे.
गेल्या दीड वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने चिंतामण सुरवाडे यांचे निधन झाले होते. त्यांनी जवळपास ४० वर्षे गावातील पाणीपुरवठा व्यवस्थेत निष्ठेने सेवा बजावली. त्यांच्या कार्याचा गौरव आणि समाजापुढे एक आदर्श ठेवण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य व प्रशासनाने याला एकमुखी संमती दिली.
या ऐतिहासिक ध्वजारोहण प्रसंगी सरपंच दिपक पाटील, उपसरपंच नुरबी तस्लीम खान, ग्रामपंचायत सदस्य, गावातील आजी-माजी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दिवंगत कर्मचाऱ्यांच्या पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा हा साकळी ग्रामपंचायतच्या इतिहासातील पहिलाच प्रसंग असून, या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
























