यावल तालुका प्रतिनिधी दि . 20 ( मिलिंद जंजाळे )
साकळी येथील लोकनियुक्त सरपंच दिपक नागो पाटील यांच्या संकल्पनेनुसार ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने
गावातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यालयातून इ.१० वी व इ.१२ वी या वर्गातून प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गुणगौरव कार्यक्रम दि. १७ रोजी ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेला होता. गावाच्या शिक्षण क्षेत्राचा यशस्वी आलेख गावासमोर यावा व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व्हावे दृष्टीकोन ठेऊन सदर गुणगौरव कार्यक्रम योजिला होता. सदर कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी असा ठरला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साकळीचे लोकनियुक्त सरपंच दिपक पाटील होते तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच नूरबी तस्लीम खान,ग्रा.पं.सदस्य खतीब तडवी,परमानंद बडगुजर,मुकेश बोरसे, माजी उपसरपंच व विद्यमान ग्रा.पं.सदस्य फक्रुद्दीन खान कुरेशी,नरेंद्र मराठे,शे.अकबरभाई यांचे सह अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यानंतर गावातील माध्यमिक विद्यालय,शिरसाड- साकळी,शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय तसेच अंजुमन ए इस्लाम उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या तिघं विद्यालयातील इ.१० वी व इ.१२ वी च्या परीक्षेत नुकत्याच लागलेल्या निकालाद्वारे विद्यालयातून प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या २२ गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ,सन्मानपत्र व शालेयभेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित शिक्षक तसेच पालकांनी मनोगत व्यक्त केले.यानंतर सरपंच दिपक पाटील यांच्या अध्यक्षीय मनोगताने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत नेवे यांनी तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक बाळकृष्ण तेली यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ कर्मचारी पंढरीनाथ माळी,ग्राम रोजगार सेवक धर्मेंद्र पाटील,कर्मचारी लीलाधर मोरे यांचे सह सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सरपंच दिपक पाटील यांच्या संकल्पनेनुसार प्रथमच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा योजिल्याबद्दल विद्यार्थी पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.





















