मुंबई दि.१० (प्रतिनिधी )”रिपब्लिकन सेना व शिंदे प्रणित शिवसेना या दोन्ही राजकीय पक्षांची राजकीय युती ही संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठीच करण्यात आलेली आहे,हे जनतेला ठासून सांगा,” असे आदेश रिपब्लिकन सेनेचे सर सेनानी तथा राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी तमाम कार्यकर्त्यांना दिले आहेत. ते मुंबई येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
रिपब्लिकन सेनेचे राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबीर रविवार दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी डॉ.आंबेडकर भवन, दादर (पू.) मुंबई येथे पार पडले. या शिबीरात प्रशिक्षक म्हणून जागतिक कीर्तीचे प्रशिक्षक डॉ. रत्नाकर अहिरे यांचे विशेष मार्गदर्शन झाले. समारोपीय भाषणात आनंदराज आंबेडकर म्हणाले, “मी आणि माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही दोघांनी युती झाल्याचे जाहीर करताच अनेक लोकांच्या पोटात पोटशूळ उठला आणि माझ्यावर अतिशय हिणकस असे आरोप करण्यात आले. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सख्खा नातू या नात्याने सांगतो की, संविधान बदलायला कोणाची माय व्याली नाही. संविधान बदलणाऱ्याचे हात छाटण्यास माझी रिपब्लिकन सेना सक्षम आहे.” ‘युत्या-आघाड्या या निवडणुकीपुरत्या असतात, युती केली याचा अर्थ आम्ही आमचे विचार आणि चळवळ गहाण ठेवली असा होत नसून संविधान व लोकशाही टिकवण्यासाठीच आम्ही सत्तेत जाऊ इच्छितो,’ या विधानावर त्यांनी विशेष भर दिला. सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत चाललेल्या या शिबीरात डॉ. रत्नाकर अहिरे, मुंबई, डॉ. बबन जोगदंड पुणे, डॉ. विजयकुमार घोरपडे जळगाव, ॲड. बुद्धभूषण राजरत्न, चिन्मय चोरगे, सिद्धेश पाटील मुंबई, भय्यासाहेब भालेराव परभणी या प्रशिक्षकांनी वेगवेगळ्या विषयांचे प्रशिक्षण दिले. शिबीराचे प्रास्ताविक महाराष्ट्र नेता डॉ. सुशील सूर्यवंशी, सूत्र संचालन महाराष्ट्र प्रदेश सचिव विनोद काळे यांनी तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र नेता श्रीपती ढोले यांनी केले. राष्ट्रीय महासचिव संजीव बोधनकर, महाराष्ट्र नेता वसंत कांबळे, महाराष्ट्र नेता प्रा. सुनील वाकेकर, महाराष्ट्र युवाध्यक्ष किरण घोंगडे, महाराष्ट्र कामगार आघाडी अध्यक्ष युवराज बनसोडे, महाराष्ट्र रिपब्लिकन सेना विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विवेक बनसोडे, मराठवाडा अध्यक्ष मिलिंद बनसोडे तसेच महाराष्ट्रातील सर्व विभागीय अध्यक्ष, सर्व जिल्हाध्यक्ष व जिल्हा महासचिव उपस्थित होते.























