रावेर यावल तालुक्याच्या भूमीत जसे केळी कपासी आणि उसाचे मळे फुलतात तसेच राजकीय जनसेवेचे मळे ही या मातीने फुलविलेले आहेत. बदलत्या काळासोबत सुसंगत नेतृत्व रावेर- यावलच्या जनतेने सातत्याने महाराष्ट्राच्या विधिमंडळात पाठवलेले आहे.
२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत रावेरचे विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून श्री. अमोल हरिभाऊ जावळे यांना जनतेने कौल दिला आणि ते प्रचंड मताधिक्य घेऊन विजयी झालेत. अत्यंत तरुण वयात श्री .अमोल यांना राज्याच्या विधिमंडळात जाण्याची संधी लाभली. या भागाचे दोन वेळेस आमदार आणि खासदार राहिलेल्या स्वर्गीय कृषीमित्र हरिभाऊ जावळे यांचे अमोल हे सुपुत्र आहेत .
स्वर्गीय हरिभाऊ यावल तालुक्यातील ‘ भालोद ‘ येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात आलेले…. जवळपास वीस वर्ष सातत्याने ते या विभागाचे लोकप्रतिनिधी होते. आपल्या शांत, संवेदनशील, हळव्या आणि चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्वाने त्यांनी राज्याच्या राजकारणात आपली विशेष ओळख निर्माण केली होती . ” जनतेशी बांधिलकी ठेवणारा सामान्य जनतेचा असामान्य नेता ” म्हणून त्यांची प्रतिमा आजही जनमानसात आदराची आणि सन्मानाचे स्थान घेऊन आहे. आमदार श्री. अमोल यांना वडिलांचे जनसेवेचे विचार ,संस्कार आणि सेवेचा वारसा लाभलेला आहे. तीच परंपरा त्यांच्या कृतीतून क्षणोक्षणी जाणवते. अत्यंत कमी वेळेत रावेर विधानसभा क्षेत्राचा सखोल अभ्यास करून त्यांनी ज्या गतीने विकास कामांची आणि जनतेच्या समस्या सोडवण्याची गती घेतली आहे ते पाहिल्यावर नक्कीच त्यांच्या आश्वासक नेतृत्वाची झलक आपणास जाणवल्याशिवाय राहत नाही.
स्वर्गीय वडिलांसारखीच अत्यंत साधी आणि सरळ राहणी, शांत आणि मीतभाषी स्वभाव ,सामान्य जनतेला सहज भेटण्याची वृती .आणि विशेष म्हणजे त्यांना भेटण्यासाठी वडिलांप्रमाणेच कुठल्याही मध्यस्ताची गरज लोकांना पडत नाही. यामुळे आपल्या आमदारकीच्या अल्पावधीतच त्यांनी लोक मनात आदराचे व विश्वासाचे स्थान निर्माण केलेली दिसते. विशेषता युवा वर्गात त्यांच्या प्रति असलेली लोकप्रियता नक्कीच मोठी आहे
* युवकांचे आयकॉन –
श्री अमोल यांनी अल्पावधीत रावेर यावल तालुक्यातील जनसामान्यांच्या लोकप्रियतेबरोबरच युवा वर्गाची लोकप्रियता प्रचंड मिळवली आहे. लहान मोठ्या सुख दुःखाच्या प्रसंगात त्यांच्या धावून जाण्याच्या आणि मदत करण्याच्या स्वभावाने युवा वर्गाचे ते आयकॉन झालेले दिसतात. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मतदार संघात ते जिथे ही जातात तिथे युवकांची लक्षणीय गर्दी त्यांची युवा वर्गातील लोकप्रियता अधोरेखित करते. ते स्वतः शांत आणि मितभासी असल्याने युवकांनाही ते नेहमीच त्यांच्या भाषणातून समाज आणि राष्ट्रप्रेम यांच्या बद्दल सकारात्मक विचारांचा संदेश देत असतात. सामाजिक सेवेत युवकांनी आपले योगदान दिले पाहिजे. याबद्दल ते नेहमीच युवकांचे प्रबोधन करीत असतात.
* शेती सिंचन ,रस्ते यावर विशेष लक्ष्य –
मतदारसंघातील अधिकाधिक लोकसंख्या शेती हा व्यवसाय करणारा असल्याने साहजिकच विकासाचा मुख्य धागा शेती हाच ठरत असल्याने श्री. अमोल यांनी अल्पावधीत मतदार संघातील शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांना विशेष प्राधान्य दिलेले दिसते.
शेतीला पक्क्या रस्त्यांशी जोडणारे पानंद रस्ते (शेतरस्ते) याबाबत त्यांनी रावेर आणि यावल तालुक्यात महसूल विभागामार्फत विशेष मोहीम राबवून प्रत्येक शेताला असलेला रस्ता मोकळा कसा करता येईल , मोकळा झालेला रस्ता वापरण्यायोग्य कसा करता येईल ? यावर त्यांनी भर देऊन रस्त्यांना महत्त्व देऊन मोठ्या प्रमाणात रस्ते मोकळे आणि विस्तीर्ण केल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यासाठी या रस्त्यांचा मोठा फायदा झाला आहे .
शेतीला मुबलक आणि अधिकाधिक वेळ वीज कशी मिळेल याबाबत त्यांनी नियोजन करून शेतकऱ्यांच्या विजेबद्दलच्या समस्या कमी करण्याचा केलेला प्रयत्न नक्कीच अभिनंदन आहे . एखादा ट्रान्सफर नादुरुस्त झाल्यानंतर तो पुन्हा कार्यान्वित होण्यासाठी बराच वेळ लागे . आता आमदारांनी त्यात विशेष लक्ष घालून तक्रार आल्यानंतर लागलीच तो ट्रांसफार्मर बदलला जातो. अशी कार्यवाही केल्याने शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा फायदा झालेला आहे. तसेच कृषी विभागाशी संवाद साधून शेतकऱ्यांना अधिकाधिक चांगले बियाणे कसे उपलब्ध होईल. पिकांवरील रोगावरती प्रतिबंध कसा करता येईल या संदर्भात शेतकऱ्यांना तात्काळ मार्गदर्शन व उपाययोजना सांगण्यासाठी त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना विशेष सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात त्यांनी घेतलेली आघाडी नक्कीच त्यांच्या स्वर्गीय वडिलांच्या भूमिकेला अधिकाधिक न्याय देणारी अशीच आहे.
*विद्यार्थी व बेरोजगार तरुण केंद्रस्थानी –
आमदार श्री .अमोल यांनी मतदार संघातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या दळणवळणाच्या समस्या , शैक्षणिक कागद पत्रकांच्या समस्या, महसूल विभागाकडून लागणाऱ्या विविध दाखल्यांच्या समस्या लक्षात घेऊन त्या त्या विभाग प्रमुखांशी संपर्क साधून गतिमान पद्धतीने सोडवण्यावर दिलेला भर त्यांच्या कार्यशैलीचा एक उत्कृष्ट नमुनाचा आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत जा – ये करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून सुलभ व गतिमान पद्धतीने प्रवास कसा करता येईल या संदर्भात त्यांनी सरळ ‘ रावेर आणि यावल’ बसस्थानक गाठून तेथील डेपो मॅनेजर, बसस्थानक कंट्रोलर आणि विद्यार्थी यांचा समोरासमोर संवाद साधून विद्यार्थ्यांच्या आणि प्रवाशांच्या समस्या अधिकाऱ्यांच्या समोरच मांडून तिथल्या तिथे सोडविल्या. त्यांच्या या समस्या सोडवण्याच्या पद्धतीने विद्यार्थ्यांसह प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. गोरगरीब विद्यार्थी शिक्षणाच्या प्रक्रियेत मोठ्या संख्येने आला पाहिजे. यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करते आहे. परिवहन विभागाने आपल्या बसेस वेळेवर आणि नियमित ठरवलेल्या मार्गावरून सुरक्षित पद्धतीने पाठवायला हव्यात. हा त्यांचा आग्रह त्यांच्यातील शैक्षणिक विकासाचा दृष्टिकोन सांगणारा आहे. गेल्या अनेक वर्षात रावेर आणि यावा आगाराला नव्या बस मिळालेल्या नव्हत्या. त्यांचे विशेष प्रयत्नाने या दोघेही आगारांना नवीन वाहने प्राप्त झालेली आहेत.
विद्यार्थ्यांसह बेरोजगार तरुणांना आणि रुग्णांना लागणारे सर्व प्रकारचे शासकीय दाखले हे विना विलंब मिळायला हवेत ,यासाठी त्यांनी महसूल विभागाचे संबंधित अधिकारी यांना योग्य त्या सूचना देऊन गाव आणि तालुका स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात हे दाखले सहज उपलब्ध करून दिल्याने लोकांना सेतू केंद्र आणि तालुका स्तरावर ज्या फेऱ्या माराव्या लागत होत्या त्या नक्कीच यामुळे कमी होऊन जनतेची वेळ आणि पैशाची बचत झाली .
आगामी कालखंडात मतदार संघातील ‘ रावेर आणि यावल ‘ या ठिकाणी बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संदर्भात मार्गदर्शन शिबिरे घेऊन रोजगाराच्या संधी अधिकाधिक कशा उपलब्ध होतील याबाबतीत त्यांचे नियोजन सुरू असल्याचे कळते.
* तात्काळ आरोग्य सुविधा मिळण्यावर विशेष भर –
आपल्या आमदारकीच्या विजयाचे सत्कार आणि स्वागत सोहळे बाजूला ठेवून आमदार श्री .अमोल यांनी मतदारसंघातील दलित ,आदिवासी शेतकरी ,शेतमजूर आणि सामान्य जनतेला ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामधून गतिमान आणि तात्काळ आरोग्य सुविधा मिळायला हव्यात यासाठी मतदार संघातील आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन तेथील कामकाज तपासून जिथे चांगले आहे तिथे अधिकाऱ्यांचे अभिनंदन तर जिथे गलथानपणा आहे तिथे कडक शब्दात संबंधितांना ताकीद देऊन दुरुस्तीचे आदेश देणारे ते लोकप्रिय आमदार ठरलेले आहेत. “शासन हजारो, लाखो रुपयाची औषधी खरेदी करून सामान्य जनतेचे आरोग्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करते. परंतु ती राबवणारी यंत्रणा जर सुस्त असेल तर त्या यंत्रणेवर कडक कारवाई केली जाईल….माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कुठल्याही घटकाची गय केली जाणार नाही .” हा त्यांनी दिलेला इशारा त्यांची सामान्य जनतेप्रति असलेली बांधिलकीच स्पष्ट करते. यासाठी मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालय, आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना ते अचानक भेटी देऊन तेथील कामकाजाची कर्मचाऱ्यांकडून माहिती घेत असतात. त्यांच्या या कार्याचे सामान्य जनतेतून मोठ्या प्रमाणात अभिनंदन होत आहे.
* मतदार संघात प्रशस्त व आधुनिक रस्त्यांच्या उभारणीवर भर
रस्ते हे गतिमान विकासाचे साधन आहेत. गाव खेड्यापासून तर शहरांपर्यंत दळणवळणासाठी मतदारसंघात पक्के रस्ते असल्याने विकासाला अधिक गती येते. हा विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मतदार संघातील मुख्य रस्त्यावरती लक्ष केंद्रित केले आहे. “अंकलेश्वर – बऱ्हाणपूर “हा महामार्ग मतदारसंघातून जात असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीचे अधिग्रहण होणार आहे. त्यासाठी माझ्या शेतकऱ्यांना त्याचा अधिकाधिक मोबदला कसा मिळेल यासाठी शासन स्तरावर त्यांचे प्रयत्न व पाठपुरावा सुरू आहे.
भुसावळ कडून फैजपुरकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावरती अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढल्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात या मार्गावर सातत्याने होत असतात . भविष्याचा विचार करून तो रस्ता देखील रुंद व्हायला हवा ,याचा वेध घेऊन त्यांनी त्या पद्धतीने संबंधित विभागाकडे केलेला पत्रव्यवहार त्यांची दूरदृष्टी सांगणारा आहे.
आमदार श्री.अमोल यांनी अवघ्या सात महिन्याच्या कार्यकाळात मतदार संघातील शाश्वत विकासाला पूरक ठरतील अशा घटकांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची मुहूर्तमेढ रोवण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न त्यांच्यातील अभ्यासू लोकप्रतिनिधीची झलक दाखवणारा आहे. आपल्या स्वर्गीय वडिलांनी या विभागाचे नेतृत्व करताना जलसिंचन, शेती, रस्ते ,आरोग्य आणि शिक्षण या घटकांवर विशेष लक्ष दिले होते. शेळगाव बॅरेज आणि महाकाय जल पुनर्भरण योजना हे स्वर्गीय हरिभाऊंचे ड्रीम प्रोजेक्ट होते. त्यापैकी शेळगाव बॅरेज हा प्रकल्प पूर्ण होऊन तो कार्यान्वित झाला आहे. त्यातून होणारी ‘ हरितक्रांती ‘ काही दिवसात नक्कीच या भागाचं आर्थिक सबलीकरण करणारी ठरेल….!
सातपुड्याच्या पर्वतरांगांमधून वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यासाठी स्वर्गीय हरिभाऊंनी महाकाय जलपुनर्भरण योजना केंद्र सरकारकडे प्रस्तावित केली होती. ती पूर्ण करण्यासाठी आणि या परिसरात जलसिंचनाच्या सुविधांच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी श्री. अमोल यांनी अल्पावधीत राज्य सरकारच्या माध्यमातून उचललेली पाऊले नक्कीच त्यांच्यातील आश्वासक लोकप्रतिनिधीची ओळख सांगणारी आहे.
आज त्यांचा जन्मदिवस. मतदार संघाचे सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या या अभ्यासू, युवा आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करणाऱ्या आश्वासक लोकप्रतिनिधीस भावी आयुष्यासाठी अनंत मंगल कामना….!
तुमच्या हातून जनतेची अशीच समर्पित भावनेने निरंतर सेवा घडत राहो, स्वर्गीय हरिभाऊंचं मंत्रीपदाच अपूर्ण राहिलेले स्वप्न तुमच्या रूपाने साकार होवो… अनंत शुभेछा…!
प्रा . जतिनकुमार मेढे, भुसावळ (जळगाव )
9545072600
























