रावेर दि . 18 ( लक्षवेध न्युज नेटवर्क ) विटवा,धामोडी पाठोपाठ कांडवेल,विवरा बु या गावातील बोगस घरकुल प्रकरणाला वाचा फुटताच रावेर तालुक्यातील इतर गावातूनही तत्कालीन बीडीओ के. पी.वानखेडे यांच्या कार्यकाळातील बोगस घरकुल प्रकरणे बाहेर पडत असल्याने जागा नसलेल्या घरकुल लाभार्थींची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. या बोगस घरकुल प्रकरणाचा पंचायत समितीतील नेमका मास्टर माईंड आहे तरी कोण? याचा शोध घेतला जात आहे.
मुळात घरकुलाचा प्रस्ताव ग्रामपंचायत स्तरावरून यावा लागतो.प्रस्ताव नसतांना घरकूलाना मंजुरी कशी दिली गेली? लाभार्थींच्या जागेची खात्री का करण्यात आली नाही? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.प्रधानमंत्री आवास योजनेसारखीच रमाई,मोदी आवास तसेच शबरी आवास योजनेचीही हीच स्थिती आहे,अशी चर्चा आहे. यातील काही गावांमध्ये तर ग्रामपंचायतीच्या परस्परच काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते बोगस घरकुल लाभार्थींच्या फाईली पंचायत समितीच्या घरकुल विभागात जमा करीत असल्याची माहिती आहे.एकट्या धामोडी गावातून गेल्या वर्षी मोदी आवास योजनेचे १०० हून अधिक घरकुल प्रस्ताव सादर झाल्याचे समजते.ग्रामपंचायतीच्या परस्पर संबंधित ग्रा. प अधिकाऱ्यास डावलून पंचायत समितीत फाईल जमा करून घेणारा झारीतील शुक्राचार्य कोण ?
घरकुल लाभार्थी याना अनुदान वितरित करण्या पूर्वी लाभार्थ्यांच्या बांधकामाला गृह निर्माण अभियंता भेट देत असतो.विटवा येथील बोगस घरकुल लाभार्थी यांना अनुदान वितरित करणाऱ्या धनगर नामक अभियंत्याने कोणत्या बांधकामांना भेटी दिल्या? पोर्टलवर लाभार्थ्यांचे कोणते फोटो अपलोड केले? लाभार्थ्यांकडे जागाच नसतांना या अभियंत्याने जागा आणली कोठून? आणि शेवटी पंचायत समितीतील या बोगस घरकुल प्रकरणाचा मास्टर माईंड आहे तरी कोण? गणेश सपकाळे की धनगर? किमान विटवा येथील बोगस घरकुल प्रकरणी तरी या दोघांभोवती संशयाची सुई फिरतांना दिसत आहे.























