यावल दि .14 तालुका प्रतिनिधी (मिलिंद जंजाळे ) यावल तालुक्यातील अट्रावल बोगस शेतकरी यांच्या विमा पॉलिसी अनुदानाच्या अपहरणाबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अट्रावल येथील अशोक गोवर्धन तायडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, यावल तालुक्यातील कृषी कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून बोगस शेतकऱ्यांच्या नावावर विमा पॉलिसी काढून अनुदान रक्कम अपहार केल्याचा प्रकार घडला आहे. अशोक तायडे यांनी आरोप केला आहे की, 2024 मध्ये 25 मायक्रो प्लॉट्सच्या माध्यमातून बोगस शेतकऱ्यांना विमा पॉलिसी रक्कम देण्यात आली असून, यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे.
तक्रारीत पुढे नमूद केले आहे की, प्रत्यक्षात ज्यांच्या नावावर पॉलिसी काढली गेली आहे, त्या शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळालेला नाही. तर, अनुदान रक्कम काही लोकांनी संगनमत करून अपहार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अशोक तायडे यांनी चेतावणी दिली आहे की, जर योग्य ती कारवाई झाली नाही, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
























