यावल दि . १५ तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) देशभक्तीच्या वातावरणात आणि उत्साहाच्या लाटेत यावल तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचा शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. उपस्थितांनी एकसुरात राष्ट्रगीत गाऊन देशासाठी निष्ठा आणि अभिमान व्यक्त केला.
सोहळ्याच्या प्रारंभी राष्ट्रीय ध्वजास वंदन करून स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करण्यात आले. तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. या प्रसंगी एकत्रितपणे देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
ध्वजारोहणानंतर तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी उपस्थितांना उद्देशून भाषण केले. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामातील वीरांच्या त्यागाची आठवण करून दिली आणि प्रत्येकाने आपल्या कार्यक्षेत्रातून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी “तंबाखूमुक्त भारत” या संकल्पनेचा महत्त्वपूर्ण संदेश देत तंबाखू मुक्त शपथ वाचन केले. उपस्थितांनी शपथ घेऊन आरोग्यदायी आणि व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमात शिस्तबद्ध रितीने राष्ट्रीय सलामी, देशभक्तीपर गीते आणि समाजहिताचे संदेश यामुळे उपस्थितांमध्ये उत्साह आणि एकात्मतेची भावना वृद्धिंगत झाली. स्वातंत्र्य दिनानिमित्त हा शासकीय ध्वजारोहण सोहळा हा देशभक्ती, एकात्मता आणि समाजभानाचा संदेश देणारा ठरला.
























