मुक्ताईनगर दि .16 (प्रतिनिधी ) मुक्ताईनगर शहरात सध्या मुख्य रहदारीच्या रस्त्यांच्या दुतर्फा उभारण्यात आलेल्या व्यापारी आस्थापनांकडून मोठ्या प्रमाणात रहदारीस अडथळे निर्माण केले जात असून रस्त्याच्याकडेला सार्वजनिक ठिकाणी असलेल्या हिरव्यागार वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे विशेष म्हणजे यासाठी मुक्ताईनगर नगरपंचायतीसह महसूल प्रशासन परवानगी देत असल्याची चर्चा आहे. यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुक्ताईनगर शहरात भुसावळ जळगाव कडे जाणारा, बोदवड जामनेर मलकापूर कडे तसेच बऱ्हाणपूर कडे आणि जुन्या गावात जाणारे असे चार मुख्य रस्ते असून या चारही मुख्य रस्त्यांच्या लगत खाजगी व्यापारी आस्थापनांनी रस्त्यापर्यंत अतिक्रमण केलेले असून शाळेमध्ये अथवा ट्युशन साठी तसेच शासकीय कामासाठी शासकीय कार्यालय व शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्याने जाताना मुठीत जीव घेऊन मोठी कसरत केली जाते. सर्विस रस्ते, फुटपाथ हे रस्ते सुद्धा दुकानदारांनी अतिक्रमित केलेले असून त्यावर दुकाने थाटले आहेत तसेच त्यावर त्यांचे दुकानांचे लोखंडी फलक लावलेले आहेत या फलकांमुळे व दुकानांमुळे बऱ्याचदा छोटे-मोठे अपघात होत असतात याकडे मात्र नगरपंचायत प्रशासन पोलीस प्रशासन तसेच महसूल प्रशासन या सर्वांचे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष आहे एखाद्या सामान्य माणसाने गरजेपोटी रस्त्यात छोटेसे अतिक्रमण केल्यास त्यावर प्रशासन लगेच कारवाई करते परंतु मुख्य रस्त्यांवरच भयंकर अतिक्रमण करण्यात आले असतानाही प्रशासन मात्र डोळे बंद करीत आहे इतकेच नव्हे तर त्या व्यापारी आस्थापनांसमोर सार्वजनिक ठिकाणांवर शंभर शंभर वर्षांपूर्वीचे डेरेदार हिरवीगार वृक्ष रहदाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून सावली व मोफत ऑक्सिजन देत आहेत. असे असताना अशी तब्बल 100 ते 150 डेरेदार वृक्ष मुक्ताईनगर शहरातील मुख्य रस्त्यावरून आज रोजी गायब झालेले दिसतात सर्वांच्या समोर हे डेरेदार वृक्ष तोडले जातात विशेष म्हणजे एम एस इ बी ची लाईट दिवसभर बंद करून ही डेरेदार वृक्ष तोडली जातात. सदर वृक्षांचा कोणालाही अडथळा नसताना अथवा त्या वृक्षांमुळे कोणाच्याही जीवितास धोका नसताना नगरपंचायत प्रशासन वृक्ष तोडण्यास परवानगी देते ही बाब नियमाच्या बाहेर नाही काय ? वृक्ष तोडण्याची परवानगी लागणाऱ्याचा सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वृक्षशी संबंध काय ? सार्वजनिक ठिकाणी असलेल्या शासकीय मालमत्तेचा कुणीही ऱ्हास करू शकतो काय आणि त्याला विशेष म्हणजे एम.एस.ई.बी.तसेच प्रशासन पाठबळ देऊ शकते काय ? परवानगी देऊ शकते काय ? ७० ते ८० फूट उंच असलेले डेरेदार वृक्ष खुशाल तोडले जातात. जर प्रशासनात असे काम करत असेल तर या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होईल काय ? नगरपंचायत प्रशासन अथवा तहसीलदार यांना झाडे तोडण्याची परवानगी देता येते काय जर देता येत असेल तर कोणत्या कारणासाठी आणि जर देता येत नसेल तर परवानगी मिळाली कशी ? परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार काय? असे एक नाणीक सवाल उपस्थित केले जात असून उद्या कोणीही सार्वजनिक ठिकाणांची मालमत्ता नष्ट करेल, त्यावर शासन काही कारवाई करू शकेल काय ? प्रशासनाच्या व धनदांडग्या व्यापाऱ्यांच्या या पर्यावरण विरोधी कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. व्यापारी रस्त्यांवर त्यांची जागा नसताना तीस तीस फूट पुढे येऊन अतिक्रमण करीत आहेत त्यामुळे पादचाऱ्यांना रहदारीत अडथळा निर्माण होत असून लहान मोठे अपघात होत आहेत त्यास जबाबदार कोण ? प्रशासन की संबंधित व्यापारी ?
————————————————–
केवळ फांद्या छाटण्याची परवानगी दिली — मुख्याधिकारी
या संदर्भात मुक्ताईनगर नगरपंचायत चे मुख्याधिकारी सुभाष जानोरे यांच्याशी संपर्क साधला असता केवळ फांद्या छाटण्याची परवानगी देण्यात आली होती असे सांगण्यात आले.
परंतु बोदवड रोड लगत असलेल्या ललित रेडिमेड समोरील वृक्ष हे 60-70 फुटाचे होते त्या ठिकाणी केवळ चार ते पाच फूट एवढे वृक्षाचे खोड उभे आहे.काही दिवसाने तेही मुळासकट कापले जातील इतकेच नव्हे तर बोदवड रस्त्यावरील अनेक वृक्ष हे मुळासकट तोडले गेले आहेत तसेच भुसावळ रोडवरील खडसे कॉलेज जवळील वडाचे भव्य वृक्ष हे मुळासकट तोडण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल काय ? असे विचारले असता चौकशी करून तसे आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असे उत्तर दिले गेले परंतु आज दीड दोन महिना संपला तरीही कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.त्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून वरिष्ठ पातळीवरून चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
























