माळेगाव दि . १ (प्रतिनिधी) माळेगाव पोलिस स्टेशन गुन्हे शोध पथकाने एका मोठ्या चोरीचा पर्दाफाश करत ७ लाख रुपये किमतीचा मिनीबस हस्तगत केला आहे. या प्रकरणात आरोपी हा चोरीस गेलेल्या मिनीबसचा चालकच असल्याचे उघड झाले आहे.
माळेगाव परिसरात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांनी पोलीस दलाला विशेष गस्त घालण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक सक्रिय झाले.
२८ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे १ ते ५ वाजण्याच्या सुमारास माळेगाव येथील राजहंस चौकातील शनी मंदिरासमोरून, बॅटरी दुकानाशेजारी उभी केलेली फोर्स मोटर्स कंपनीची टेम्पो ट्रॅव्हलर मिनीबस चोरीला गेल्याची फिर्याद सचिन बाबासो कोकरे (रा. धुमाळवाडी, ता. बारामती) यांनी दिली होती. या मिनीबसची किंमत तब्बल ७ लाख रुपये आहे.
फिर्याद मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासणीदरम्यान बस चालक प्रदीप रामचंद्र शिंदे (रा. हावागज, ता. बारामती) याच्यावर संशय घेतला. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
फोर्स मोटर्स कंपनीची पांढऱ्या रंगाची मिनीबस किंमत : ₹७,००,०००/- एकूण ७ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, आरोपीविरुद्ध माळेगाव पोलीस स्टेशन गु.र. नं. २२३/२०२५, बी.एन.एस. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार राहुल पांढरे करत आहेत.
ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. संदिपसिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यामध्ये सहा. पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, पोलीस हवालदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे तसेच अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, नितीन कांबळे आणि अमोल वाघमारे यांचा सक्रिय सहभाग होता.
























