यावल दि .12 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे )
लोकशाहीच्या मजबुतीसाठी आणि सर्वसामान्य मतदारांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करत, मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारी भिम आर्मी – आजाद समाज पार्टी आता थेट राजकीय रणांगणात उतरली आहे. सरंजामशाही व्यवस्थेला ठामपणे नकार देत आणि सामाजिक परिवर्तनाचे ध्येय बाळगत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
या अनुषंगाने, जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय भिम आर्मी भारत एकता मिशनचे जळगाव जिल्हा प्रमुख मा. गणेश भाऊ सपकाळे व जामनेर तालुका प्रमुख तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा. प्रबुद्ध खरे यांनी भुसावळ येथे पार पडलेल्या बैठकीत जाहीर केला.
स्वबळावर निवडणूक लढवायची की समविचारी पक्षांशी युती करायची, यासंदर्भात लवकरच चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भिम आर्मी – आजाद समाज पार्टीचा हा निर्णय सामाजिक न्याय व लोकशाही मूल्यांना बळ देणारा असून, स्थानिक पातळीवरील समस्यांवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याच्या दिशेने मोठे पाऊल ठरणार आहे.
























