मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) दि . 5 .तालुक्यातील बोदवड ग्रामपंचायतीचे अधिकारी गजानन सरोदे यांना ग्रा. प. चे जबाबदार पदाधिकारी आणि ग्रामस्थ सातत्याने त्रास देत असल्याने त्यांच्याकडील बोदवड ग्रा. प. चा कार्यभार काढून अन्य ठिकाणी त्यांची बदली होणेसाठी आणि तेथील सरपंच,उपसरपंच तसेच कार्यकारी मंडळावर ग्रा प अधिनियम १९५९ कलम ३९(१) नुसार अपात्रतेची कार्यवाही करण्यासाठी संघटनेकडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे निवेदन देण्यात आले आहे.निवेदनावर अध्यक्ष महेंद्र दुट्टे आणि सचिव एकनाथ कोळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ग्रा. प. बोदवड येथे गजानन सरोदे सहा महिन्यापासून कंत्राटी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.मात्र त्यांच्या अंगावर धावून जाणे,त्यांना मारहाण करणे,जीवे मारण्याच्या धमक्या देणे,बेकायदेशीर कामांसाठी दबाव टाकणे इत्यादी त्रास दिला जात असल्याने सरोदे दोन महिन्यांपासून प्रचंड तणावाखाली वावरत आहेत.या पूर्वी कार्यरत ग्रा प अधिकारी यांची देखील या गावाबाबत तक्रारी आहेत,या ग्रामपंचायतीस काम करण्यास तालुक्यातील एकही ग्रा प अधिकारी तयार नसल्याने पंचायत समिती समोर नवा पेच निर्माण झाला आहे.यातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल कसा मार्ग काढतात,ते येणाऱ्या काळात समजेल.तूर्त बोदवड ग्रा प चे कामकाज ठप्प झाल्याचे चित्र दिसून येत आहे.























