रावेर दि . 22 (प्रतिनिधी ) जळगाव जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाद्वारे संचालित मागासवर्गीय मुलांच्या 11 वस्तीगृहांमध्ये अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. या वस्तीगृहांवर गृहपालांच्या व्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांच्या सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रावेरचे मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह गृहपाल कुंदन पाटील यांच्याकडे असून त्यांच्याकडे एकाचवेळी चार वस्तीगृहांचे जबाबदारी दिल्या गेल्याने व्यवस्थापन कसे योग्य प्रकारे होणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
रावेर प्रभारी गृहपालाकडे 4 वस्ती गृहांची जबाबदारी …
रावेर येथील मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह तसेच रावेरच्या मुलींचे वस्तीगृह, बोदवड व भुसावळ येथील वस्तीगृह देखील कुंदन पाटील यांच्याकडे आहेत. या गृहपालाने अद्याप पर्यंत रावेर येथील वस्तीगृहाला भेट दिली नाही, यामुळे विद्यार्थ्यांच्या गरजा आणि सुखसोयींवर परिणाम होत असल्याची तक्रार आहे. वस्तीगृहाचा दैनंदिन कारभार सध्या एका लिपिकाच्या देखरेखीखाली चालत आहे, तो लिपीक देखील जळगाव येथे राहतो त्याने देखील आपली जबाबदारी शिपायी यांकडे सोपविली आहे . यामुळे व्यवस्थापनातील दोष किती आहे याला कोण जबाबदार ? असा प्रश्न विचारला जात आहे .
विद्यार्थ्यांच्या सुखसुविधा व गरजा दुर्लक्षित ?
वस्तीगृहांमध्ये रहाणाऱ्या मागासवर्गीय मुलांना दर्जेदार शिक्षण व सुखसोयीची अपेक्षा असते. मात्र, गृहपालांची अपूर्ण उपस्थिती, एक गृहपालाकडे एकाधिक वस्तीगृहांचा भार असणे यामुळे विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यामध्ये अडचणी येत आहेत. त्यांच्या आहार, सुरक्षितता, स्वच्छता आणि अभ्यासासाठी आवश्यक सुविधा याकडे योग्य ते लक्ष दिले जात नाही असा चिंताजनक प्रश्न आहे.
सामाजिक न्याय विभाग मंत्री संजय शिरसाळ यांनी लक्ष देण्याची गरज
या संदर्भात सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाळ यांचे लक्ष वेधणे महत्त्वाचे ठरले आहे. वस्तीगृहांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रशासनाने त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे. गृहपालांच्या कार्यप्रणालीत स्पष्टता आणणे आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. अन्यथा, मागासवर्गीय मुलांचे भवितव्य धोक्यात येण्याची भीती आहे.
जळगाव जिल्ह्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहांच्या व्यवस्थापनात या समस्यांचा त्वरीत निवारण होणे अत्यंत आवश्यक आहे. अशा स्वरूपाच्या गंभीर प्रश्नांकडे मंत्री संजय शिरसाळ आणि संबंधित यंत्रणेने त्वरेने लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थ्यांना सुरक्षित व सुखकर वातावरण उपलब्ध करून देणे हे सामाजिक न्यायाच्या उद्दिष्टांचे मूळ आहे. गृहपालांच्या योग्य नियोजनाशिवाय आणि सततच्या देखरेखीशिवाय हे ध्येय पूर्ण होणे शक्य नाही.
























